सत्यभामा आणि रुक्मीणी या आपल्या दोन बायकांशी एकदा भगवान गोपालकृष्ण गप्पागोष्टी करीत बसले असता, गप्पांच्या ओघात सत्यभामेनं विचारलं, 'नाथ, मी आपल्याला कशी प्रिय वाटते?' गोपालकृष्ण म्हणाले, 'सत्यभामे ! तु मला श्रीखंडासारखी प्रिय वाटतेस.' लगेच रुक्मिणीनंही तोच प्रश्न भगवंताला विचारला असता ते मुद्दाम म्हणाले, तू ना रुक्मिणी ? तु मला मिठासारखी, प्रिय वाटतेस .'
आपण आपल्या पतीला श्रीखंडाप्रमाणे प्रिय असल्याचे ऎकून सत्यभामा बेहद्द खुष झाली, तर 'पतीला आपण मिठाप्रमाणे वाटतो, 'असं कळताच रुक्मिणी तिथून रागानं तरातरा-निघून गेली. आपल्याला सर्वात अधिक प्रिय असलेली रुक्मिणी रागावल्याचे पाहून, गोपालकृष्णांनी स्वयंपाक्याला त्या दिवशी स्वयंपाकात मीठ बिलकूल न घालण्याची सूचना केली आणि जेवणात गोडाची वस्तू म्हणून श्रीखंड करायला सांगितले. स्वयंपाक तयार झाला.

अगदी सुचनेनुसार पुर्णपणे आळणी. गोपालकृष्ण जराही कुरबुर न करता नेहमीप्रमाणे पोटभर जेवले. त्यांच्यानंतर रुक्मिणी व सत्यभामा या जेवायला बसल्या. वरणभाताचा पहिला घास तोंडात घालतात, तो वरणाला मीठ नाही. आमटी व भाजी चाखून बघितली, तर त्यांचीही तीच गत ! अगोदरच रागावलेली रुक्मिणी स्वयंपाक्यावर खेकसून म्हणाली, 'आज स्वयंपाक करताना तुझं लक्ष कुठे दुसरीकडे होतं का?' स्वयंपाक पार आळणी झालाय !' भगवंताच्या सुचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला, 'आज मीठ संपल होत म्हणून स्वयंपाक आळणी करणं भाग पडलं. अर्थातच श्रीखंड होतं; तेव्हा बाकीच स्वयंपाक आळणी असला तरी निभावून नेता येइल, असं मला वाटलं.'
रुक्मिणी म्हणाली, 'श्रीखंडाशिवाय जेवण अडून रहात नाही. इतर सर्व स्वयंपाक चांगला असला की झालं, आणि इतर सर्व स्वयंपाक मिठाशिवाय चांगला होणं शक्य आहे का ?' रुक्मिणीन पानात प्रथम वाढलेलं अन्न कसंबसं संपवलं, आणि ती आणि ती अर्धपोटीच उठून आपल्या महालात जाऊन फुरंगटून बसली. तिच्या पाठोपाठ गोपालकृष्ण तिच्या महालात गेले आणि मुद्दाम म्हणाले, 'रुक्मिणी आज तुझं जेवण एवढ्या लवकर कसं झालं ? मला वाटलं, आज जेवणात श्रीखंडाचा बेत आहे, तेव्हा जेवण सावकाशीन आस्वाद घेत घेत होणार.'
रुक्मिणी रागानं म्हणाली, 'श्रीखंडाचं कौतुक तुम्हाला; मला नाही. बाकीचा स्वयंपाक नुसता आळणी होता; आणि कारण विचारलं तर बल्लवाचार्य म्हणतो, मीठ संपून गेलंय ! मिठाशिवाय स्वयंपाकाला जरातरी चव येईल का?' यावर गोपालकृष्ण पटकन म्हणाले, ' मीठ नाही म्हणजे स्वयंपाकाला चव नाही, हे तुच म्हणतेस ना ? मग मी मघाशी म्हणालो की तू मला मिठासारखी प्रिय आहेस. अग, तुझ्याशिवाय माझं जीवन बेचव होईल जाईल.' पतीच्या बोलण्यातली ही खोच लक्षात येताच रुक्मिणी कळी एकदम खुलुन गेली.

Post a Comment Blogger

 
Top